प्रस्तुत पंक्तियाँ मराठी में है | मेरी बड़ी बहन ने इन्हें लिखा है |उसने यह कल्पना की है की आज मेरी ८३ साल की माँ अकेलेपन में क्या सोचती होगी |बहुत ही सुंदर अभिव्यक्ति है ,मेरी मराठी भाषा की पकड़ जरा कमजोर है पर बावजूद इसके मेरे मन ने कहा " वाह!"
असं का वाटतं?
किलकिलत्या डोळ्यांची, इवल्या इवल्या पावलांची
कालच जन्मलेली ही बाळं, पाहता पाहता मोठी झालीत
त्यांना बोट धरून चालायला शिकवता शिकवता
तीच माझी काठी झालीत, आयुष्याच्या सायंकाळी प्रकाशाची ज्योत झालीत.
मी विचार करते कि परवा परवाच तर ही चिमुरडी जरा जराश्यात रडायची,
तिच्या आसवांची गंगा यमुना काठोकाठ भरायची
कसं होणार हिचं? मला सारखी काळजी असायची
संसाराच्या गंगेत हिची नाव कशी काय टिकायची?
आणी हा! गोंडस छोटा, लाल गुबगुबीत गालांचा
बालविहारात खेळताना पडला, खरचटला तर,
"अहो तुमचे टोमाटो आज फुटलेत " असा
टोकेकर बाईंचा लगेच निरोप यायचा.
खेळकर, पण हट्टी होता, भर बाजारात लोळायचा
तरी आपल्या विविध खोड्यांनी सर्वांना मोहायचा.
पशु प्राणी इतके प्रिय कि, रस्त्यावरच्या कुत्र्याला उचलून आणून
त्याला दूध मिळे पर्यंत हा नाही जेवायचा
मोठा झाला, समंजस झाला, सेवेच्या व्यवसायात शिरला.
सह्चरणी सव बरोबरीनी जनसेवेच्या कार्यात गुंतला.
वडीलधार्यांना मान देत दोघांनी सांभाळला व्यवसाय
जगाचं त्यांच्यावर प्रेम पाहता मी म्हणावे काय
ती मात्र दूर दूर गेली, तुरळक झाल्यात भेटी
माझ्या मनी तिच्या जीवनाची चित्र नेहमी रंगती
प्रेमळ आणी धैर्यवान साथी तिला होता, तरी
कशी असेल, काय करत असेल हा प्रश्न मनी होता
हा जवळ आहे, रोज डोळ्यांना दिसतो
तरी वाटतं माझ्यापासून खूप दूर असतो
मग ती जेंव्हा येते, हे सहजच आहे समजावते,
तेंव्हा तीच माझी आई व मी तिची लेक होते.
ती आल्यावर होणारा आनंद वेगळाच असतो
कारण माझ्या बोलण्याला तिचे कान व माझ्या कानाला तिचा स्वर मिळतो
सर्व सुखी आहेत, मी विरक्त व्हायाला हवं हे जरी मला समजतं, तरी
ह्या दोघांनी एकदा माझ्या कुशीत झोपावं असं का मला वाटतं?
Thursday, February 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment